Pimpri News: कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता; सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस बंदी

पालिकेचा आदेश, घरगुती पद्धतीने पूजा साजरी करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने यंदा सार्वजनिकरित्या तलाव, नदी किनारी छटपूजा साजरी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने परवानगी नाकारली आहे.

छटपूजेसाठी गर्दी होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आज (बुधवारी) काढलेल्या परिपत्रकात सामूहिक छटपूजा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर भारतीय नागरिकांतर्फे छटपूजेचे आयोजन केले जाते. छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक तलाव, नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. मात्र, आता दिवाळी उत्सवानंतर आणि हिवाळा लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पूजेवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन होणार नाही. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा नदी किनारी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पूजेला परवानगी देण्यात येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत. याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.

भाविकांनी छटपूजा घरगुती पद्धतीने साजरी करावी. खासगी जागेत, घरात पूजा करताना सुरक्षित अंतराचे पालन करुन नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियम भंग करणा-यांवर, मास्क सुयोग्य पद्धतीने परिधान न करणे, रस्त्यावर थुंकणे, विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर कारवाई करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.