Pimpri News: भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांचे निधन

एमपीसी न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे काल (मंगळवारी) रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.

त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ‘सिल्क रुट’ जाहिरात कंपनीचे प्रमुख विवेक वाणी तसेच टोटल अ‍ॅडव्हर्टायझिंग सोल्युशन्स (टास) या जाहिरात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व लाडशाखीय वाणी समाज विकास संस्थेचे माजी अध्यक्ष योगेश वाणी यांचे ते वडील होत.

पिंपरी-चिंचवड नवनगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपचे ते जुने कार्यकर्ते होते. भाजपच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा वैयक्तिक परिचय व संबंध होता. दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. आणीबाणीच्या काळात ते 19 महिने नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस व शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचेही ते माजी सदस्य होते. मध्यंतरी काही काळ पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पुढे प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. एक उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती होती.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय-धोरणांबाबत मतभेद झाल्यानंतर ते परत भाजपमध्ये स्वगृही परतले होते. भाजपने त्यांची प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. पुढे प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.