Pimpri News: शाईफेक प्रकरण! भाजप नगरसेविकेसह 11 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नगरसेविका आशा तानाजी धायगुडे-शेंडगे, पूजा अरविंद भंडारी (वय-25),  शीतल पंकज पिसाळ (वय-21), गौरी कमलाकर राजपाल (वय-31), आशा जैसवाल (वय-40),  शीतल महेश जाधव (वय-36),  जयश्री रामलिंग सनके (वय-33), संध्या रमेश गवळी (वय-47),  स्वप्नील भारत आहेर (वय-21),  संजय शंकर पवार (वय-19), संजय शेडगे (वय-45, सर्व रा. कासारवाडी) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत.

कासारवाडीत गणेशोत्सवात रस्ते खोदई केली जात असल्याने रहदारीला अडथळा ठरत असल्याचे सांगत सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी (गुरुवारी) महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या नामफलकावर, कार्यालयात शाई फेकली. भालकर यांच्या अंगावर शाई टाकण्याच्या उद्देशाने नगरसेविका शेंडगे आणि त्यांच्या अन्य समर्थकांनी आपसात कट रचला.

भालकर यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीवर फुले आणि काळी शाई टाकली. टेबलवर ‘धिक्कार’ असे लिहिले. महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी दालनातून बाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षा रक्षक, पोलिसांना धक्काबुक्की करून आयुक्तांच्या दालनाच्या भिंतीवर लावलेल्या नावाच्या नामफलकावर काळी शाई फेकली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शुक्रवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मोघम तक्रारी करत नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्यांच्या प्रभागातील स्मार्ट सिटीचे काम अडविले होते. दीड वर्षे काम अडविण्यात आले होते. काम वेळेत आणि लवकर पूर्ण केले जाईल असे सांगूनही त्यांनी  नामफलकवर, कार्यालयात शाई फेकली.  त्यांना काय सिद्ध करायचे होते हे माहित नाही.

आयुक्तांच्या खुर्चीची गरीमा आहे. मलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर, बाकीचे अधिकारी घाबरतील. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दिल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.