Pimpri news: शरद पवार पुन्हा धावले पिंपरी-चिंचवडकरांच्या मदतीला; पालिकेकडे दिली 50 रेमडेसिवीर इंजेक्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार हे पिंपरी-चिंचवडकरांच्या मदतीला पुन्हा एकदा धावले आहेत. कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे महागडे रेमडेसिवीरची 50 इंजेक्शन त्यांनी शहरातील बाधित रुग्णांसाठी पिंपरी पालिकेला दिली आहेत. कोरोना बाधित गोरगरीब रुग्णांसाठी ती वापरण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली. यापूर्वी देखील पवार यांनी पालिकेला 50 इंजेक्शने दिली होती.

शरद पवार यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. पालिकेच्या कोरोना वॉर रूमला भेट देत शहरातील कोरोना परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज एक हजाराच्या पटीत कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या इपाट्याने वाढत आहे. कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी देण्यात येत आहेत.

शरद पवार यांनी पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना बाधित गोरगरीब नागरीकांसाठी यापूर्वी 50 इंजेक्शन दिली होती. आज आणखी 50 इंजेक्शने दिली आहेत. गोरगरीब रुग्णांना ही इंजेक्शने द्यावीत अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी आज पालिकेला अचानक भेट दिली. त्याची कोणालाच कल्पना नव्हती. तब्बल 18 वर्षांनी पवार यांनी पालिकेला भेट दिली असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या महामारीत आपले शहराकडे लक्ष असल्याचा संदेशही पवार यांनी या भेटीतून दिला असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.