Pimpri News: खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील खासगी रुग्णालये ताब्यात घ्यावीत. तिथे कोविड केअर सेंटर सुरु करावे, अशी मागणी भोसरी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील 15 दिवसात शहरामध्ये हजारो कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. वायसीएमएच, भोसरी, बालनगरी, ऑटो क्लस्टर, जिजामाता या कोविड सेंटरच्या ठिकाणी सर्वसामान्य कोरोना रुग्णांकरिता बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने प्राण गमवावा लागला आहे.

मागील वर्षामध्ये खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना रुग्णांची अक्षरश: आर्थिक लुट झालेली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये ताब्यात घेवून कोविड सेंटर चालू करण्यात यावे. महापालिकेच्या वतीने त्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, सचिन सानप, तुषार सहाने, अनिल सोमवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.