Pimpri News : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत कामगार नेते अमोल कलाटे आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश करण्यात आला आहे. गजानन चिंचवडे यांच्या भाजप मध्ये प्रवेश करण्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी गजानन चिंचवडे यांच्या प्रवेशाची माहिती दिली. तसेच ‘आगे आगे देखो होता है क्या…’ असेही म्हटले आहे. त्यामुळे पुढे कोणत्या नेत्याचे पक्षांतर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी जिल्हा प्रमुख या नात्याने अनेक राजकीय आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सन 2009 विधानसभा, सन 2014 लोकसभा आणि विधानसभा, सन 2019 लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत गजानन चिंचवडे यांच्याकडे शिवसेना पक्षाने प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती.

गजानन चिंचवडे शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची स्थायी समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती होणार होती. मात्र पक्षाने ऐनवेळी त्यांची नियुक्ती नाकारली. त्यामुळे त्यांची पक्षात घुसमट झालेली असावी, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.