Pimpri News : शिवसेनेतर्फे आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी व वंचितांना ‘एक हात मदतीचा’

कामगार नेते इरफान सय्यद यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – यंदाही कोरोनाचे संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू नका, त्याचप्रमाणे जाहीरात फलकही लावू नयेत. त्याऐवजी मतदारसंघात समाजोपयोगी उपक्रम राबवून जनतेला दिलासा द्या, असे आवाहन खेड-भोसरी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनीदेखील आवाहनाला साद देत सेवाकार्याचे आयोजन करून आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी, वंचितांना एक हात मदतीचा दिला.

कोरोनाच्या काळात कष्टकरी वर्गाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना ‘मदतीचा एक हात द्या’ या आवाहनाला भोसरीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटना व साद सोशल फाउंडेशनने कष्टकरी बांधकाम कामगारांना अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले. नाका कामगारांसाठी सुदामा थाळी हा उप्रकम राबविण्यात आला.

पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर नाका कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. रूपीनगर-तळवडे परिसरात मराठवाडा युवा मंचाच्या वतीने सुजाता काटे व महिला मंडळ यांच्या वतीने तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. मावळ तालुक्यातील समुद्रा कोविड सेंटर (टाकवे) व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कान्हे वडगाव मावळ येथे स्टीमर (वाफेचे मशीन) वाटप करण्यात आले. देवळे गावातील नैसर्गिक शिक्षण व संशोधन प्रशिक्षण संस्था इथे अनाथ मुलांना अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात राजे ग्रुपकडुन पळस्टिका बालकाश्रम, राजाराम पाटील वृद्धाश्रम, अन्नपुर्णा केंद्र राजुरी येथे किराणा वाटप, विठाई साबीर अन्नछत्र लंगर नारायणगाव येथे लाडू वाटप, तर मुस्तफा अन्सारी यांच्याकडून अन्नदान करण्यात आले.

कामगार नेते इरफान सय्यद  म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकार हे नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. मात्र, करोनाचा धोका टळलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे. उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून शासनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.