Pimpri News: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश

कोरोना जागतिक महामारी काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल

एमपीसी न्यूज – कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोना बाधितांसाठी झोकून देऊन काम केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या लंडनमधील संस्थेच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. संस्थेचे सचिव डॉ. दीपक हरके, महाराष्ट्र उपाध्यक्ष महबूब सय्यद यांच्या हस्ते खासदार बारणे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या महामारीच्या काळात खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. गेले जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते दुसरी लाट या संकंट परिस्थितीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संक्रमण काळात कोरोना बाधित रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार व्हावेत यासाठी मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेऊन मदत केली.

कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत त्यांना मदत केली. अन्न धान्य वाटप कोरोना हॅास्पिटलसाठी साहित्याची मदत, कोरोना रूग्णांचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न केले. बिलांची रक्कम कमी करून दिली. या सर्व कार्यांची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन मध्ये खासदार बारणे यांचा समावेश झाला. त्यांना प्रमाणपत्र देत केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

खासदार बारणे म्हणाले, “कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांना एकटेपणा जाणवू दिला नाही. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मदतीला धावून गेलो. वैद्यकीय उपचाराच्या सुविधा निर्माण केल्या. नागरिकांना योग्य उपचार मिळण्यासाठी मदत केली. गोरगरिबांना अन्न धान्याची मदत केली. माझ्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या लंडनधील संस्थेने दखल घेतली. गौरव केला. हा पुरस्कार मी सर्व कोविड योद्धांना समर्पित करत आहे. माझ्या कार्याची दखल घेत मला सन्मानित केल्याप्रित्यर्थ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे मनस्वी आभार मानतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.