-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: शिवसेना तीन महिन्यांपासून गटनेत्याविना!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक सहा महिन्यावर आली असताना आणि आगामी महापौर शिवसेनेचाच होणार अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेला तीन महिन्यापासून गटनेता निवडता आला नाही. त्यामुळे अगोदरच दिशाहीन असलेले नगरसेवक सैरभैर झाले आहेत. तर, नवनियुक्त शहरप्रमुखांचाही नुकत्याच झालेल्या महासभेत आवाज घुमला नाही. त्यांनी सभागृहात शब्दही काढला नाही. अशी परिस्थिती असताना शिवसेना कसा आपला महापौर बसविणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गटा-तटात विभागलेल्या शहर शिवसेनेला राज्यातील सत्तेचाही फायदा घेता येत नसल्याचे दिसून येते.

शिवसेनेत खासदार श्रीरंग बारणे आणि नगरसेवक राहुल कलाटे असे दोन गट आहेत. त्यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू असते. शिवसेनेच्या नऊ नगरसेवकामध्ये कोणताही ताळमेळ नसतो. महापालिकेत विरोधात असूनही सभागृहात एकही नगरसेवक आक्रमकपणे बोलत नाही. फेब्रुवारीमध्ये स्थायी समिती सदस्य निवडीवरून या दोन गटातील वाद उफाळला. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिल्याचा आरोप करत एक गट आक्रमक झाला होता. त्यांनी कलाटे यांची पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली होती.

त्यावर पक्षश्रेष्टींनी कलाटे यांना 24 फेब्रुवारी रोजी शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. आदेश देऊनही राजीनामा दिला जात नसल्याने तत्कालीन शहरप्रमुखांनी प्रसिद्धी पत्रक काढत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 16 मार्च 21 रोजी कलाटे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन तीन महिने उलटले. तरी, नवीन गटनेत्याची शिवसेनेला निवड करता आली नाही. तीन महिन्यांपासून शिवसेना गटनेत्याविना आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तीन महिने गटनेता निवडता येत नसलेली शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत शहराचा महापौर शिवसेनेचाच करण्याचे स्वप्न सत्यात कसे उतरविणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत बदल केला. थेरगावचे नगरसेवक सचिन भोसले यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. भोसले संघटना वाढीसह महापालिका सभागृहात पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडतील असे अपेक्षित होते. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत भोसले यांचा महासभेत आवाज घुमला नाही. त्यांनी सभागृहात शब्दही काढला नाही. शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असताना, संघटनेची ताकद असतानाही फक्त गटा-तटात विभागल्याने शिवसेनेचे मोठे राजकीय नुकसान झालेले दिसून येते. शिवसेनेला मावळ तिसऱ्यांदा काबीज करण्यात यश आले. पण, पिंपरी विधानसभा गमवावे लागले. महापालिकेतील संख्याबळाची घट सुरूच आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी निवडणुकीत नगरसेवक संख्या आणखी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम म्हणाले, “कोरोनामध्ये नियुक्त्या, निवडणुका घेऊ नयेत असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे नाव जाहीर करण्याचे थांबले आहे. खासदार, जिल्हाप्रमुखांशी चर्चा करून सर्वसहमतीने नाव निश्चित केले आहे. त्याचे पत्रही बनविले आहे. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे नावाचे पत्र सादर करूनही ते अडकून राहील. त्यामुळे पत्र सादर केले नाही. राज्य सरकारने नियम शिथिल केलेले पत्र कधी मागे घेतले. याची दोन दिवसांत माहिती घेतो. संघटनेत बदल केले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरू आहे”.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn