Pimpri News : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या किवळे प्रवेशद्वारावर चेंबुरच्या धर्तीवर शिवसृष्टी उभारणार

शिवसृष्टीच्या नाहरकतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे निवेदन

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर बाह्यवळण महामार्ग किवळे पासून वाकडपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधुन जात आहे. या महामार्गाच्या संमातर असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या किवळे येथील मोकळ्या जागेत चेंबुरच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्यासाठी नाहरकत दाखला मिळावा यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधुन जात असलेल्या मुंबई-बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर किवळे पासून वाकडपर्यंत सर्व्हीस रस्ता बनविणेत आला आहे. महामार्गालगत असलेल्या पुनावळे, वाकड, मामुर्डी व किवळे या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे तसेच या भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असुन नजिकच देशातील मोठी हिंजवडी आय.टी. पार्क असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या भागात नोकरदार व कामगार वर्गासाठी मोठमोठे गृहप्रकल्प तयार झाले आहेत व अजुनही नविन गृहप्रकल्प तयार होत आहे. या भागात नवनविन गृहप्रकल्प झाल्याने लोकवस्तीमध्ये वाढ झाली आहे त्याचा परिणाम महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर झाला असुन हा सर्व्हिस रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी या सर्व्हीस रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे.

या भागात होत असलेले वाढते नागरिकरण व अपुरी असलेली वहातुक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधुन जाणाऱ्या मुंबई-बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथे पुणे ते मुबंई आणि मुंबई ते पुणे असे जाणाऱ्या व येणाऱ्या मुंबई बेंगलोर महामार्गाच्या दुभाजकामध्ये मोठा चौक असुन तेथे मोकळी जागा आहे. ती जागा विकसित झाल्यास शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

चेंबूर, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसीत केला आहे. हा चौक संपुर्ण मुबंई शहराची ओळख बनला आहे. चेंबूर, मुंबईच्या धर्तीवर पिंपरी चिवड शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथील पुणे ते मुबंई आणि मुंबई ते पुणे असे जाणाऱ्या व येणाऱ्या मुंबई बंगळूर महामार्गामधील असणाऱ्या मोकळ्या जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खर्चाने छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्याचा मानस आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. तेव्हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या किवळे येथील दुभाजकाच्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवसृष्टी विकसित करण्यासाठी नाहरकत दाखला मिळणे गरजेचे आहे जेणेकरुन किवळे येथील शहराचे प्रवेशद्वार पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत विकसित करणे शक्य होईल. यासाठी नाहरकत मिळावी असेही निवेदनात म्हटले आहे.

याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.