Pimpri News : शिवभक्त अनिकेत घुले यांना ‘शिवनिश्चल पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – नाशिक येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या दरवर्षी देण्यात येणार ‘शिवनिश्चल पुरस्कार’ यंदा मावळचे शिवभक्त पै. अनिकेत घुले यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या ५ सप्टेंबरला देवळाली, नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत घुले यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी म्हणाले, अनिकेत घुले हे दरवर्षी शिवनेरी ते रायगड पालखी सोहळा आयोजित करून शिवकार्य तरुणपिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा व्यायामाकडे वळावे, हा संदेशही ते तरुणांना देत असतात.

‘गाव तिथे शिवराय आणि भीमराय’ ही संकल्पही ते राबवित आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीदान करण्याचे आवाहन ते करतात. दान स्वरूपात मिळालेल्या मूर्ती गावातील तरुण मंडळांना भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, शिवशक्ती भीमशक्तीची एकजूट व्हावी, यासाठी अनिकेत घुले प्रयत्नशील आहेत.

लॉकडाऊन, महापूर त्याचबरोबर राज्यावर आणि देशावर संकट आल्यास जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरून ‘रिअल हिरो’च्या रूपात अनिकेत घुले सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची शिवनिश्चल पुरस्कारासाठी निवड केल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांनी सांगितले.

दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून घुले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.