Pimpri News: कोरोनाच्या नियमांचे पालन करुन शिवजयंती होणार साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. शासनाच्या कोविड 19 संदर्भातील नियमावलीचे पालन करून या वर्षी शिवजयंतीचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिका प्रभावी नियोजन करेल, असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शहरातील शिवरायांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, त्या ठिकाणची स्थापत्य, विद्युत आणि सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी शिवजयंती विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या. शालेय स्तरावर शिवरायांच्या विचारावर आधारित निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे वेळेत नियोजन करावे, शिवकार्याचा प्रचार प्रसार करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात यावा, जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करून या जयंती कार्यक्रमांची प्रसिध्दी करावी, आदी सूचना करण्यात आल्या.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करीत असते. शासनाच्या कोरोना संदर्भातील नियमावली विचारात घेऊन यावर्षीचा विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम निश्चितपणे आयोजित केला जाईल.

या बैठकीस उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या आरती चोंधे, झामाबाई बारणे, निर्मला कुटे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अंकुश कानडी, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे उप आयुक्त संदीप खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, प्रविण ढसाळ, संतोष जोगदंड, मराठा सेवा संघाचे भरत रणसिंग, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, निलेश शिंदे, सागर तापकीर, नकुल भोईर, शिवस्मारक प्रतिष्ठानचे सुरेंद्र पासलकर, छावा संघटनेचे धनाजी पाटील राजेंद्र चेडे, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, भारतीय लहुजी पँथरचे युवराज दाखले, सचिन लिमकर, जनकल्याण प्रतिष्ठानचे अजय पाताडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.