Pimpri News: धक्कादायक! ‘सीसीसी’ सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना तब्बल सव्वा पाच कोटींची बिले

प्रशासकीय टिपणीतून प्रकार आला उघडकीस

एमपीसी न्यूज – भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये कधीच एकही रुग्ण दाखल झालेला नसताना स्पर्श हॉस्पीटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत तब्बल 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बीले महापालिकेला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासकीय टिपणीतून उघडकीस आला आहे. विषेश म्हणजे या ठिकाणी केवळ बेड उपलब्ध केले होते. रुग्णसंख्या घटल्याने या ठिकाणी एकही रुग्ण ठेवण्यात आला नव्हता. असे असतानाही सव्वा पाच कोटींची बीले सादर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल, अनामत रक्कम भरणा न केल्याने बीले देण्याची गरज काय, अशी विचारणाही आयुक्तांनी शेरा मारत केली आहे.

शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. त्याकरिता ‘अ’,’ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये विभागणी करुन कोविड सेंटर कार्यान्वित केले होते.

भोसरी येथील स्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन ठिकाणी ‘अ’ श्रेणीतील कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याकामी स्पर्श हॉस्पीटल यांना 7 ऑगस्ट 2020 रोजी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी कार्यरंभ आदेश दिला होता. त्याकरिता 1239 प्रतिदिन प्रतिबेड इतका दर निश्चित करण्यात आला होता.

तथापि, या संस्थेच्या कार्यारंभ आदेशातील अटीनुसार त्यांच्यामार्फत ईएमडी भरण्यात न आल्याने, मनुष्यबळाची माहिती मुदतीत सादर केली नसल्याने करारनामा करण्यात आलेला नाही. त्यानंतर 21 सप्टेंबर 2020 रोजी म्हणजेच जवळपास 45 दिवसांनी मनुष्यबळाची यादी सादर करण्यात आली.

यादीमध्ये नमूद कर्मचा-यांपैकी स्टाफनर्स कर्मचा-यांचे नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. तसेच अनामत रक्कमही भरलेली नाही. दोन्हीही सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी पूर्ण झाल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार दोन्हीही सेंटरची तपासणी करुन अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी भोसरी रुग्णालय यांना कळविण्यात आले होते. त्यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी अहवाल सादर केला.

या अहवालानुसार रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन्हीही कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी पेशंट किट, साफसफाई साहित्य, डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पीपीई किट, मास्क उपलब्ध नसल्याचे कळविले होते.

तसेच नियमाप्रमाणे दोन बेडमध्ये आवश्यक अंतर नसणे, टॉयलेट सुविधा मानांकाप्रमाणे नसल्याचे, आपातकालीन ऑक्सीजन सिलेंडर, औषधे, इतर आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे, अग्निशामक सुरक्षा साधने, जनरेटर बॅकअप नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर औषधांचा साठा व यादी, लिनेन साहित्य, जैव वैद्यकीय घनकचरा नोंदणी, कर्मचारी हजेरीपत्रक देखील उपलब्ध नसल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

संस्थेमार्फत वरील बाबींची पूर्तता झालेली नसल्यामुळे त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात आलेला नाही. तथापि, असे असतानादेखील या संस्थेमार्फत त्यांचे सीईओ डॉ. अमोल हाळकुंदे यांनी 1 नोव्हेंबर 2020 रोजी रामस्मृती मंगल कार्यालयाच्या कामाकाजापोटी 1 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर या कालावधीकरिता दोन कोटी 63 लाख 30 हजार 400 रुपये आणि हिरा लॉन्स येथील कामकाजापोटी दोन कोटी 63 लाख 30 हजार 400 रुपये अशी पाच कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बिले सादर केली आहेत.

वास्तविक या संस्थेमार्फत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. आवश्यक मनुष्यबळाची माहिती विलंबाने सादर केल्याने व नियमानुसार अनामत रक्कम भरण्यात आलेली नसल्याने त्यांच्यासमवेत करारनामाही करण्यात आलेला नाही.

महत्वाचे म्हणजे दोन्हीही सेंटर येथे कधीच एकही रुग्ण दाखल झालेला नसताना डॉ. होळकुंदे यांच्यामार्फत सादर करण्यात आलेली बीले चुकीची व महापालिकेची फसवणूक करण्याच्या हेतूने सादर केली असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.

या बाबींचे अवलोकन करता या दोन्हीही सेंटर येथील कामकाजापोटी सादर करण्यात आलेली बिले ही निव्वळ महापालिकेची फसवणूक आहे. त्याकरिता डॉ. हळकुंदे दोषी आहेत. यास्वत त्यांच्यावर नियमाधीन कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी, असा शेरा मुख्य लिपिकाने दिला आहे.

कोविड केअर सेंटरचे सर्व व्यवहार शंकास्पद – कलाटे

कोरोना काळात महापालिकेने अंदाजे 220 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगितले जात आहे. करारनामा, अनामत रक्कम दिली नसतानाही कोविड सेंटरला तीन कोटी रुपये दिले आहेत. सर्व व्यवहार शंकास्पद आहे. कोविड सेंटरच्या खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते.

कामाचा आदेश, कर्मचारी हजेरीपत्रकाची माहिती दिली जात नाही. सर्व प्रक्रिया चुकीची झाली असून हा विषय दफ्तरी दाखल करण्यात यावा. कोविडवरील खर्चाला आमचा विरोध नाही. चुकीच्या पद्धतीने पैसे देण्यास तीव्र विरोध आहे. जोपर्यंत संपूर्ण माहिती दिली जात नाही. तोपर्यंत पैसे देण्यास विरोध असल्याचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.