Pimpri news: ‘आरटीई’ प्रवेशासाठी अल्प प्रतिसाद; 3786 पैकी फक्त 2013 विद्यार्थ्यांचे प्रवेश

'आरटीई' प्रवेशासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 3786 विद्यार्थ्यांची ‘लॉटरी’ पद्धतीने निवड झाली खरी, मात्र त्यापैकी केवळ 2013 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. अल्प प्रतिसादामुळे ‘आरटीई’ प्रवेशासाठी पंधरा दिवसांची म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत मुतवाढ दिली असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले.

आरटीई प्रवेशासाठी शहरातील 176 शाळा पात्र आहेत. त्यात पिंपरी ब्लॉकमधील 66 व आकुर्डी ब्लॉकमधील 110 खासगी शाळांचा समावेश आहे.

आरटीई प्रवेशासाठी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी पार पडली. त्यात 3786 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांना कागदपत्रांची पूर्तता करत प्रवेश निश्चित करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

या मुदतीमध्ये फक्त 2013 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामध्ये पिंपरी विभागामध्ये 1533 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी 739 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून,794 जागांवर अद्याप प्रवेश होणे बाकी आहे.

तर आकुर्डी विभागात 2253 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी 1274 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून 979 जागा शिल्लक आहेत. दोन्ही विभागाची मिळून 1773 विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहे.

या सोडतीत निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आवश्यक कागदपत्रे पडताळणी करूनप्रवेश निश्चित करावा लागत आहे.

त्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. मात्र, मुदत संपेपर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सोडतीमध्ये निवड झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश नाही घेतले तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल असे पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.