Pimpri News: भीमसृष्टी शिल्पांमध्ये मनुस्मृती दहनाचा प्रसंग दाखवा; अन्यथा तीव्र आंदोलन

मराठा सेवा संघाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील भीमसृष्टी शिल्पांमध्ये ( Bhimshrishti sculpture) महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक मनुस्मृती दहनाचा ( manusmriti Burning)  प्रसंग उभारला नसल्याचा आरोप करत तो प्रसंग लवकर उभारावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा सेवा संघाचे ( Maratha Seva Sangh) शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे ( Ad. Laxman ranvade) यांनी दिला आहे.

मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. रानवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण ( Municipal Commissioner Shravan Hardikar) हर्डीकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, महासचिव सचिन दाभाडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा स्मिता म्हसकर, पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, माणिक शिंदे, शितल घरत, रत्नप्रभा खराडे, शाम पाटील, वाल्मिकी माने, राजेश सातपुते, वधू-वर कक्ष शहराध्यक्ष मोहन जगताप, शाखा अध्यक्ष रविंद्र इंगवले, ज्येष्ठ नागरिक कक्ष जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महापालिकेने भीमसृष्टी हा प्रकल्प उभारला आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंतच्या प्रसंगाचे शिल्प या ठिकाणी उभारले आहे.

मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना म्हणून ज्याची इतिहासात नोंद असलेला मनुस्मृती दहनाचा प्रसंग मात्र जाणीवपूर्वक टाळल्याचे हे शिल्प पाहताना जाणवत आहे.

जातीयतेची व विषमतेची क्रांतीज्योत पेटविणारा मनुस्मृती दहनाचा प्रसंग या शिल्पांमध्ये नसल्याने बाबासाहेबांच्या सामाजिक व सांस्कृतिक लढयाची ही सुरुवातच खोडून टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असल्याची खात्री यानिमित्ताने पटत आहे.

समानतेची चौकट मोडणाऱ्या व शुद्र मनुष्याला प्राण्यांपेक्षाही क्रूर वागणूक देण्याचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहिररित्या दहन करुन बाबासाहेबांनी समानता व सार्वभौम लोकशाहीची मांडणी संविधान लिहून पूर्ण करीत या व्यवस्थेला चपराक दिली आहे.

त्यामुळे ज्या ग्रंथातून मानवतेची थट्टा, चेष्टा व क्रूरता मांडली गेली तिचे दहन करणारा प्रसंग शिल्पाद्वारे महापालिकेने दाखवून तत्कालीन व्यवस्था कशी होती. बाबासाहेबांनी त्यास कसा सुरुंग लावला हे जनतेला व शहरवासीयांना दाखविणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.