एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर यांचा ‘श्यामची आई कृतज्ञता सोहळा’ गुरुवारी (दि. 18 फेब्रुवारी) राळेगणसिद्धी येथे होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी गावात ट्रेनिंग सेंटरमध्ये हा सोहळा दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे.
पद्मविभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते श्रीमती कलाबाई दौडकर आणि महाराष्ट्रातील प्रतिथयश कवी भरत दौडकर माता आणि पुत्राचा ‘श्यामची आई सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच ‘साने गुरुजी विचार साधना पुरस्कार’ विद्या विकास मंदिर राजुरी येथील प्राचार्य जी के औटी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे तर स्वागताध्यक्ष रिकाम्या हातांना काम देणारे रंगनाथ गोडगे पाटील, प्रमुख अतिथी नारायण सुर्वे कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे असणार आहेत. कार्यक्रमात “कृष्णाकाठ”दिवाळी अंक पारितोषिक प्रथम क्रमांक ‘वारसा’ मसाप अहमदनगर द्वितीय क्रमांक ‘शब्दचैतन्य’ पिंपरी चिंचवड, तृतीय क्रमांक ‘शब्द शिवार’ मंगळवेढा सोलापूर, उत्तेजनार्थ ‘उद्याचा मराठवाडा’ नांदेड मराठवाडा, ‘अधोरेखित’ वसई मुंबई या दिवाळी अंकाना देण्यात येणार आहे.
सन 2015 आणि 2017 मध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त गुणवंत कामगारांचा सन्मान पद्मविभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.