Pimpri news: चाकणऐवजी भोसरीतूनच ऑक्सिजन पुरवठा सुरळित करा – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयांना चाकण येथील प्रकल्पांतून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. शहरातून चाकणचे अंतर जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठा होण्यास अनेकदा विलंब होऊन कोरोना रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत ऑक्सिजन निर्मिती करून त्याचा पुरवठा करणारे काही पुरवठादार आहेत. सध्या कोरोना रुग्णांची गरज लक्षात घेऊन भोसरीतूनच पिंपरी-चिंचवडमधील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळित करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, अशी विनंती आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचा शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांना शहरातील 135 खासगी आणि महापालिका रुग्णालये आरोग्य सुविधा देत आहेत. याशिवाय महापालिकेनेही कोविड केअर सेंटर उभारले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज असते. अशा रुग्णांची संख्या मोठी झाली आहे. शहरातील खाजगी कोविड रुग्णालये व जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी गंभीर अवस्थेतील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच रुग्णालयांच्या व्यवस्थापनांची मोठी दमछाक होत आहे.

अनेक रुग्णालये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे रुग्णाला घेऊन ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या रुग्णालयाची शोधाशोध करताना रुग्णाचे कुटुंबिय व नातेवाईकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सर्व खासगी व जम्बो कोविड सेंटरला एका दिवसाला 2500 ते 3000 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, 20 ड्युरा सिलिंडर ऑक्सिजन आवश्यकता आहे. या सर्व रुग्णालयांना पुरविण्यात येणारा ऑक्सिजन तयार करणारा प्रकल्प चाकण येथे आहे. पिंपरी-चिंचवड ते चाकण हे अंतर लांब असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे.

प्रसंगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादविवादाचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. मागणीनुसार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने खाजगी रुग्णालये व महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.

सध्याची ऑक्सिजन सिलिंडरची मागणी पाहता पिंपरी-चिंचवडमधील सर्व खाजगी रुग्णालये व महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला भोसरी येथील पुरवठादारांकडून सिलिंडर उपलब्ध झाल्यास वेळ वाचणार आहे.

तसेच चाकण येथील ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रकल्पावरील पिंपरी-चिंचवड शहराचा ताण कमी होऊन जिल्ह्यातील इतर तालुक्यांना त्याचा फायदा होऊन वादविवादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत. या सूचनेचा गांभीर्याने विचार करून त्याबाबत आपल्या स्तरावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.