Pimpri News: झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, हॉकर्स झोन राबवू शकलो नसल्याची खंत – श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जेवढे श्रीमंताचे आहे, तेवढेच गरिबांचे आहे. शहरातील रस्ते जेवढे वाहनचालकांसाठी आहेत. तेवढेच पादचा-यांसाठी देखील आहेत. गोरगरिबांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि हॉकर्स झोन राबवायचे होते. पण, पावणेचार वर्षाच्या कारकीर्दीत ते राबवू शकलो नसल्याची खंत मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.

विकास कामे करताना निधीची कमतरता भासू दिली नाही. आहे त्या स्थितीत उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला. शहराच्या विकासात कुठे कमी पडलो असेल तर शहरवासीय माफ करतील असेही ते म्हणाले.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज (शुक्रवारी) राज्य सरकारने पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी बदली केली. त्यांच्याजागी ओडिसा केडरचे राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी महापालिका आयुक्तपदी वर्णी लागली आहे. बदलीनंतर आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पावणेचार वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली.

हर्डीकर म्हणाले, शहरात दिखाव्याच्या कामांकडे लक्ष न देता फाऊंडेशनल कामाला प्राधान्य दिले. शहराला अनेक बाबतीत ‘ पोट्यांशिअल’ आहे. शहर परिवर्तनाची निमिर्ती, जुळणी केली. त्यावर काम केले. कचरा संकलन समस्या मार्गी लावली. नवीन वेस्ट टू इनर्जी सुरु होईल. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. आंद्रा, भामा-आसखेडच्या पाणी आरक्षण पुर्नजिवीत केले. 27 टाक्या, 200 किलो मीटर पाईपलाईनचे काम सुरु आहे. अतिरिक्त पाणी उचलण्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविली. सर्व भागात योग्य पद्धतीने पाणी पोहचू शकले, अशी व्यवस्था केली आहे. व्यापक शहरहिताच्या दृष्टीने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

शहरात जलनि:सारणावर काम केले. पूर्वी 240 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात होती. आता दिवसाला 280 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. जुन्या रस्त्यावरील पादचारी मार्गाची सुधारणा केली. सार्वजनिक वाहतूक बळकटीकरणासाठी प्रयत्न केले. न्यायालयीन कचाट्यात असलेले बीआरटी मार्ग सुरु केले. हरित सेतू प्रकल्पाचे बीज रोवले. वैद्यकीय क्षेत्रात खूप चांगल्या सुधारणा केल्या. वायसीएमएचमधील पदव्युत्तर संस्थेची अंमलबजावणी केली. शिक्षण विभागात पुरेसे काम करता आले नाही, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.