Pimpri News : स्मार्ट सिटी कंपनी म्हणायचं की स्मार्ट भाजप कंपनी? – संजोग वाघेरे पाटील

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पदावर भाजपचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची नियुक्ती झाल्याची बाब समोर आली आहे. ही कारभारातील गोपनियता, विश्वासार्हता धोक्यात आणणारी गंभीर बाब आहे. या प्रकाराने स्मार्ट सिटीतील भाजपचा हस्तक्षेप उघड झाल्यामुळे आता स्मार्ट सिटी कंपनी म्हणावे की ‘पिंपरी चिंचवड स्मार्ट भाजप कंपनी’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे‌ पाटील यांनी आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, नामदेव ढाके हे भाजपचे सत्तारुढ पक्षनेते आणि सध्या ते स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक देखील आहेत. त्यांच्या सोबत मागील काही वर्षे त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीची जर स्मार्ट सिटीच्या महत्त्वाच्या पदावर वर्णी लावली जात असेल, तर स्मार्ट सिटीच्या कारभारात भाजपचा असलेला हस्तक्षेप आणि वशिलेबाजी उघड होत आहे.

या संदर्भात या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनुभवी व पात्र उमेदवारांनी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. काही अधिका-यांकडूनही या नियुक्तीत हस्तक्षेप झाल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या आणि स्मार्ट सिटीच्या कारभारात या प्रकारे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या पदाधिका-यांशी संबधित व्यक्ती महत्त्वाच्या पदावर काम करणार असतील, तर ही बाब गंभीर आहे.

या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी प्रशासन चालवत आहे की भाजप ? हा प्रश्न निर्माण होतो. कारभारातील गोपनियता आणि विश्वासार्हता धोक्यात येते. याचा गांभीर्याने विचार करून कंपनीचे सीईओ म्हणून महापालिका आयुक्त यांनी तातडीने नियुक्ती रद्द करणे अभिप्रेत आहे. अन्यथा, स्मार्ट सिटी कंपनीत होणाऱ्या हस्तक्षेपाला प्रशासक म्हणून आयुक्त आणि संपूर्ण यंत्रणा देखील जबाबदार आहेत. या पद्धतीने कारभार होणार असल्यास कंपनीचे नाव बदलून ते स्मार्ट भाजप कंपनी असे करण्याची मागणी असल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.