Pimpri Crime news: रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी अपक्ष नगरसेविकेच्या मुलाला अटक

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चिखलीतील भाजप संलग्न अपक्ष नगरसेविकेच्या मुलाला अटक केली आहे.

वैभव अंकुश मळेकर (वय 20 रा. चिखली) असे अटक केलेल्या नगरसेविकेच्या मुलाचे नाव आहे.वैभव हा पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे. त्याच्या आणि त्याच्या साथीदाराकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.

पुणे पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम नवनाथ आरवडे (वय 22) आणि वैभव अंकुश मळेकर (वय 20) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

वरील सर्व आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शन अवैधरित्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किमतीला विक्री करत होते.

तसेच डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची ते विक्री करताना आढळून आले आहे. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.