Pimpri News : ख्रिसमस निमित्त पिंपरी-चिंचवड आगारातून सोलापूर, कोल्हापूरसाठी धावणार विशेष गाड्या

एमपीसी न्यूज – ख्रिसमस नाताळ निमित्त पुणे विभागाच्या पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगारातून सोलापूर आणि कोल्हापूरसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सोलापूरसाठी दोन, तर कोल्हापूरसाठी एक गाडी सोडण्यात आली असून 24 ते 28 डिसेंबर या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.

पिंपरी-चिंचवड ते सोलापूर या मार्गावर दररोज रात्री आठ वाजता एक आणि साडेआठ वाजता एक अशा दोन गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर या मार्गावर रात्री अकरा वाजता एक गाडी सोडण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड स्थानक प्रमुख पल्लवी पाटील म्हणाल्या, “ख्रिसमस निमित्त सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर तीन गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास या फे-या आणखी वाढवण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बस गाड्यांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता केली जात आहे. चालक आणि वाहक देखील योग्य ती खबरदारी घेत आहेत. गाड्यांसाठी प्रवाशांची मागणी वाढल्यास फे-या देखील वाढवण्यात येणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

ग्रुप बुकिंग, मालवाहतूक आणि देवदर्शनाचीही सोय

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड आगारातून ग्रुप बुकिंग देखील केले जाते. किमान 30 ते 35 प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची सोय केली जाईल, असे स्थानक प्रमुख पाटील म्हणाल्या. त्यापटीने प्रवाशांची संख्या वाढल्यास मुबलक प्रमाणात बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातात.

‘अष्टविनायक दर्शन’ बस उपलब्ध

चतुर्थी निमित्त अष्टविनायक दर्शन करण्याची अनेक गणेश भक्तांची इच्छा असते. त्यासाठी स्वतंत्र वाहन अथवा प्रवासाचे साधन नसल्याने ती इच्छा मनातच राहते. अशा गणेश भक्तांसाठी पिंपरी-चिंचवड आगाराने ‘अष्टविनायक दर्शन’ बस उपलब्ध केली आहे.

त्याशिवाय देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी देखील राज्य परिवहन महामंडळाने सोय केली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना देवीच्या दर्शनासाठी देखील जाता येईल.

कंपन्यांमधील सामान, उत्पादने पिंपरी-चिंचवड शहरातून दुस-या शहरात नेण्यासाठी देखील महामंडळाच्या ट्रक उपलब्ध आहेत. वल्लभनगर आगाराशी संपर्क करून या सर्व सेवांचा लाभ घेता येईल, अशी माहिती स्थानक प्रमुख पाटील यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.