Pimpri News: ‘वायसीएमएच’ मधील स्टाफ नर्सचे काळ्या फिती बांधून प्रशासनाविरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज – “सर्व मानधन स्टाफ नर्सची एकच आस, कायमस्वरुपी हाच ध्यास”, “कायम करा, कायम करा स्टाफ नर्सला कायम करा”, “आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे”, “एकतेचे बळ दाखवूया, अधिकाराची रक्षा करुया”, “न्याय हा झालाच पाहिजे, अधिकाराची रक्षा झाली पाहिजे”, “हम सब एक है”, अशा जोरदार घोषणा देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील स्टाफ नर्संनी कायमस्वरुपी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. आज (मंगळवारी) हाताला काळ्या फिती बांधून स्टाफ नर्सनी वायसीएमएच समोर प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली.

कोरोनाच्या भीषण काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो रुग्णांची सेवा करुन जीव वाचविण्यात मदत करणा-या परिचारिकांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जाते. परंतु या कोरोनायोद्ध्यांवर सध्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात परिचारिकांना कायमस्वरुपी करुन घेणार, पगारवाढ देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या.परंतु या आश्वासनांची पूर्तता तर दूरच या परिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली.

गेल्या 12 वर्षांपासून परिचारिका वायसीएममध्ये मानधनावर कार्यरत आहेत. त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा आणि इतर आर्थिक लाभ दिले जात नाहीत. या परिचारिकांना महापालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने महासभेमध्ये ठराव केले. त्याला महापौर उषा ढोरे यांनी मान्यता दिली.मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप त्यांना महापालिका सेवेते सामावून घेण्यात आले नाही.

कोरोनामध्ये या परिचारिकांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा केलेली असतानाही त्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.