Pimpri News: मेडीकल गॅस पाईपलाईनच्या 18 कोटीच्या विषयाला स्थायीची ‘आयत्यावेळी’ मान्यता

न्यायालयात जाण्याचा भाजप नगरसेवकाचा इशारा; आयुक्तांकडून चुकीच्या कामाला खतपाणी घातल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या चार रुग्णालयात मेडीकल गॅस पाईपलाईन बसविण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 17 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, या कामासाठी ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्रांच्या मुल्यमापनात गंभीर चूका असून याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगितले.

यात सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीच्या माजी सभापती आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेच्या नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भांडार विभागाने 4 जानेवारी 2021 ला निविदा प्रसिद्ध केली होती. 26 कोटी 61 लाख रुपयांच्या या निविदेसाठी सुरुवातीला 5 निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता.

मात्र, कुठलेही कारण न देता तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा रद्द केली होती. त्यानंतर नव्याने 28 जानेवारीला निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदेसाठी 5 फेब्रुवारी ही सात दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत 9 जणांनी सहभागी झाले. यापैकी 8 ठेकेदार पात्र ठरले असून एकजण अपात्र ठरला आहे.

पात्र ठरलेल्या शुभम ईपीसी यांनी चार रुग्णालयात मेडीकल गॅस पाईपलाईन बसविण्यासाठी 17 कोटी 56 लाख 60 हजार रुपये दर सादर केला. अंदाजपत्रकीय 26 कोटी 61 लाख 18 हजार 947 आणि जीएसटीपेक्षा 33.99 टक्के त्यांचे दर कमी आहेत. हे दर 5 वर्ष वारंटी व वारंटी कालावधी संपल्यानंतर दोन वर्ष फ्री देखभाल दुरुस्तीसह स्वीकृत करण्यात आले आहेत.

त्यानुसार शुभम ईपीसी यांना हे काम देण्यात येणार आहे. नवीन भोसरी रुग्णालय 3 कोटी 42 लाख, नवीन जिजामाता रुग्णालय 4 कोटी 48 लाख 60 हजार, आकुर्डी रुग्णालय 4 कोटी 21 लाख आणि थेरगाव 5 कोटी 45 लाख अशा चार रुग्णांलयासाठी 17 कोटी 56 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे. शुभम ईपीसी यांच्याकडून काम करुन घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

आयुक्तांकडून चुकीच्या कामाला खतपाणी, न्यायालयात जाणार – तुषार कामठे

भाजप नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, ”शुभम ईपीसी’ ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्रांच्या मुल्यमापनात गंभीर चूका आहेत. ही ठेकेदार कंपनी इंडस्ट्रीज क्षेत्रात वापरणा-या उत्पादित कंपनीचे ‘प्रॉडक्ट’ वापरत आहेत. शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनी कंपनीने उत्पादित केलेले साहित्य देखील वापरण्यास बंदी घातली आहे.

तरीही ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने ‘एजीएसएस सिस्टीम’ हे चीनच्या कंपनीचे असल्याचे आढळून आलेले आहे.याकडे संबंधित पालिकेच्या अधिका-यासह सल्लागाराने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आयुक्त राजेश पाटील चुकीच्या कामाला खतपाणी घालतात. याप्रकरणात न्यायालयात जाणार असल्याचेही कामठे यांनी सांगितले”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.