_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवड मतदारसंघाकडे?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सत्ता संतुलन राखण्यासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघात देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहे. तोपर्यंत भाजपच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले जाणार, हे उघड गुपित आहे.

शेवटच्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीची चावी हाती ठेवण्यासाठी भाजपमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी मतदारसंघातील रवी लांडगे आणि चिंचवड मतदारसंघांमधील शत्रुघ्न काटे या दोन प्रबळ दावेदारांमध्ये तीव्र चुरस आहे. त्यापैकी  कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की ऐनवेळी भाजप दुस-या कोणाला संधी देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या बाजूने कौल दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला केवळ दहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. शेवटच्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

शिवसेनेतून भाजपात आलेल्या भोसरी मतदारसंघातील सीमा सावळे यांना पहिल्यावर्षी, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वाकडमधील माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड यांना दुस-या वर्षी, पक्षातील जुने कार्यकर्ते भोसरीतील विलास मडिगेरी तिस-या वर्षी आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले संतोष लोंढे यांना चौथ्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले.

सावळे, मडिगेरी भोसरीतील असले तरी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जातात. आता महापौर, सभागृहनेतेपद चिंचवड मतदारसंघात तर उपमहापौरपद पिंपरीत आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीची चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणत्या मतदारसंघात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे शहराध्यक्षपद भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे असल्याने सत्ता संतुलन राखण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदारसंघाकडे देण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे (1 मार्चपासून), शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव (1 मार्चपासून) असे 16 सदस्य स्थायी समिती आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.