Pimpri News : पुणे पालिकेच्या धर्तीवर शहरी गरीब योजना सुरु करा : आमदार अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांना मोठ्या खर्चाच्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरी गरीब योजना सुरु करण्यात यावी. तसेच, पुणे महानगर पालिकेने मिळकत धारकांचा विमा उतरविलेला आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील नियमित मिळकत कर भरणाऱ्या करदात्यास विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत आमदार बनसोडे यांनी आयुक्त पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत रूग्णांवर केले जाणारे वैद्यकीय उपचार ‘सीजीएचएस’ दरपत्रकानुसार केले जातात.

एका आर्थिक वर्षासाठी पुणे मनपा कार्यक्षेत्रातील एका कुटूंबासाठी एक हजार ते एक लाख रूपये इतका खर्च पॅनेलवरील खासगी रुग्णालयातील वैद्यकीय उपचारांकरिता देण्यात येतो. ही योजना तातडीने शहरात सुरू करावी, अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

तसेच, पुणे महापालिकेने पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरु केली आहे. यात निवासी मिळकतकर धारक व त्यांचे कुटुंब तसेच सेवा शुल्क भरणारे नागरिक व त्यांचे कुटुंब यांच्यासाठी पाच लाखांचे अपघाती विमा संरक्षण, आणि शहरातील नागरिकांना विमा कवच देण्यात आले आहे.

याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील नियमित मिळकत कर भरणाऱ्या कर दात्यास विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी बनसोडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.