Pimpri News: निवासी अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवा; महापौरांचा आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. लोकांची राहती घरे पाडणे चुकीचे आहे. सर्वसामान्यांच्या वाटेला जाऊ नका, निवासी अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबविण्याचे आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. व्यावसायिक इमारतींवरील कारवाईला आमची काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाईकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, कोरोनामुळे लोकांना जगणे मुश्किल झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरु असून प्रशासनाकडून घरे पाडण्याचे काम केले जात आहे. कोरोना काळात लोकांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. घर पूर्ण बांधून झाल्यावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. अनधिकृतपणे घर बांधायला सुरुवात करताच कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होत नाही. पूर्ण बांधकाम झाल्यावर घर पाडले जाते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले जाते. चिखली, सोनवणेवस्तीमधील अनेक लोकांची घरे पाडली. घरांचा बांधकाम पूर्ण होण्यास बीट निरीक्षक जबाबदार नाहीत का, अनधिकृत मोठ्या इमारतीही पाडू नयेत. त्याल सील करुन महापालिकेने ताब्यात घ्याव्यात. घरांवरील कारवाई थांबविण्यात यावी.

भाजपचे कुंदन गायकवाड म्हणाले, आयुक्त सुडबुद्धीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करतात. आयुक्तांवरच कारवाई करणे गरजेचे आहे. भाजपचे राहुल जाधव म्हणाले, अनधिकृत बांधकामे होत असताना बीट निरीक्षक झोपा काढत होते का, दोन ते तीन मजल्यांचे बांधकाम होईपर्यंत अनधिकृत विभाग काय करतो. बांधकाम होण्यापूर्वीच कारवाई का होत नाही. आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

आरक्षणात, रस्त्यावर, हेतुपुरस्सर चार मजले वाढविण्या-यांवर कारवाईस हरकत नाही. परंतु, परवानगी मिळत नसल्याने घर बांधणा-यांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे भाजपचे अभिषेक बारणे म्हणाले. त्यावर महापौर उषा ढोरे म्हणाल्या, कोरोना काळात कारवाई करणे चुकीचे आहे. लोकांना अर्धा, एक गुंठा जागा घेऊन घरे बांधली आहेत. योग्यवेळीच अनधिकृत बांधकामे पाडली नाहीत. निवासी घरांवरील कारवाई थांबवावी. व्यावसायिक इमारतींवरील कारवाईला आमची काहीच हरकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.