Pimpri news: भाजपकडून विकासकामांना खोडा, शिवसेनेकडून पाठिंबा

; पिंपळेगुरवमधील सिमेंट रस्त्याच्या बाजूने राहुल कलाटे यांचे मतदान; भाजपला नव्हे शहर विकासाच्या बाजूने मतदान - कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील सत्ताधारी भाजप राजकीय आकसापोटी वाकडमधील विकास कामात खोडा घालत असताना शिवसेना, राष्ट्रवादीने आपण शहर विकासाच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले. भाजपने वाकड येथील रस्ते विकास कामाचे प्रस्ताव बहूमताच्या जोरावर पूर्वी फेटाळले असताना त्याच विषयपत्रिकेवरील पिंपळेगुरव येथील सिमेंट रस्त्याच्या बाजूने मतदानाची मागणी करत शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले. विकास कामात राजकारण करायचे नसते, असा संदेश यातून कलाटे यांनी भाजपला दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आणि मागील तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर वाकड येथील रस्ते विकासाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनामार्फत मांडलेले दोन प्रस्ताव सत्ताधारी भाजपने विकासाकामात राजकारण करत, राजकिय आकसापोटी मतदान घेत बहुमताच्या जोरावर फेटाळले होते.

रस्त्यांची नागरिकांना मोठी आवश्यकता असतानाही भाजपने प्रस्ताव फेटाळल्याने वाकड परिसरातील नागरिकांकडून चीड व्यक्त केली जात होती.

तर, याच तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर पिंपळेगुरव येथील सिमेंट रस्ते विकासाचा विषय होता. त्यावर मतदान घेण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. विशेष म्हणजे कलाटे यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

आपण विकासाच्या विरोधात नाही. संपूर्ण शहराचा विकास झाला पाहिजे, असा संदेश त्यांनी सत्ताधारी भाजपला दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

संपूर्ण शहराचा विकास हेच ध्येय, भाजपला नव्हे विकासाच्या बाजूने मतदान – कलाटे

याबाबत बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, संपूर्ण शहराचा समान विकास झाला पाहिजे, अशी माझी व शिवसेनेची नेहमीच भूमिका असते. विकासकामात आम्ही कधीच राजकारण करत नाही. त्याउलट सत्ताधारी भाजप वागत आहे. राजकीय आकसापोटी, सूड भावनेतून भाजपने वाकड येथील प्रशासनाने मांडलेले विषय फेटाळले आहेत. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच रस्ते विकासाचा विषय फेटाळले. विशेष म्हणजे मतदान घेवून प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा चेहरा उघड होत जनतेसमोर आला आहे. वाकडमधील नागरिक सर्वांत जास्त कर भरतात. तरीही भाजप या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपळेगुरव येथील रस्ते विकासाच्या प्रस्तावाच्या बाजूने मी मतदान केले. आमचा विकास कामांना कधीच विरोध नसतो आणि नसणार आहे. भाजपने देखील संपूर्ण शहराच्या विकासाचे धोरण ठेवावे. अन्यथा जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.