Pimpri News: शहरातील रस्ते खोदाई थांबवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी अद्यापही रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे ताबडतोब थांबवून सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करुन द्यावेत. आजपर्यंत झालेल्या या कामांचे लेखापरिक्षण करावे. तसेच प्रशासनाच्या आणि शहरातील नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करुन काम न केलेल्या नालेसफाईची बिले देणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या या पत्रात वाकडकर यांनी म्हटले आहे की, पावसाळा सुरु झाला असतानाही रस्ते खोदणे, सिमेंटचे रस्ते बनविणे हे संयुक्तिक नाही. पावसामुळे या कामाचा दर्जा योग्य राहणार नाही तसेच ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. तसेच अद्यापही शहरातील नाले, नदीची साफसफाई झाली नाही. आता काही दिवसातच मुसळधार पाऊस पडून नदीनाल्यातील कचरा वाहुन जाईल.

तसेच नदीतील जलपर्णीही वाहून जाईल. अद्यापही गावठाण परिसरातील व अनेक झोपडपट्ट्यांमधील नाले साफसफाई पुर्ण झाली नाही. त्यामुळे या भागात पाणी साचून दलदल निर्माण होऊन पावसाळ्यातील साथीचे आजार वाढतील आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल.

महापालिका कार्यक्षेत्रात विविध प्रभागात आजपर्यंत अनेक ठिकाणी विविध कारणांसाठी रस्ते खोदाईची व पदपथ बांधण्याची कामे संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक रस्त्यांवर वाहतुक विस्कळीत होत आहे. वस्तुता: दरवर्षी 15 मे नंतर शहरामध्ये कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदू नयेत. तसेच खोदलेले रस्ते पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुरुस्त, डांबरीकरण करुन वाहतुकीस पुर्ववत करुन देण्याचा प्रघात आहे.

परंतू, यावर्षी शहरामध्ये मान्सूनचा पाऊस सुरु झाला तरीही अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यापैकी बहुतांशी ठिकाणी सिमेंट रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी मल:निस्सारण वाहिनी, पावसाळी गटारे, शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यासाठी केबल टाकणे, खासगी कंपन्यांच्या केबल टाकणे यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.