Pimpri News: पे-अँड पार्किंग योजनेची पठाणी वसुली बंद करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांचे खिसेकापून सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवकांनी बगलबच्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पे अँड पार्किंग योजना लागू केल्याचा आरोप करत पे अँड पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली पठाणी वसुली तत्काळ बंद करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योगव्यवसाय, व्यापाऱ्यांवर अत्यंत गंभीर परिणाम झाले असून या शहरातील सामान्य करदात्या नागरिकाच्या हाताला काम नाही,रोजगार नाही‌. लॉकडाऊनचे गंभीर परिणाम म्हणून सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांचे बजेट पूर्णपणे ढासळले आहे. कोरोना त्याचबरोबर वेगवेगळे साथीचे आजार यामुळे दवाखान्याचा खर्च वाढला आहे.

शिक्षणाच्या संदर्भात देखील सर्वसामान्य नागरिकांना खर्च परवडणारा नाही. अशा परिस्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व आपण सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ देऊन दिलासा देण्याऐवजी पालिकेचे पदाधिकारी,नगरसेवक, बगलबच्चे, कार्यकर्ते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील करदात्या नागरिकांना विश्वासात न घेता 1 जुलै पासून पे अँड पार्किंग या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. नागरिकांकडुन पठाणी पध्दतीने वसुली सुरू केली आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.

महापालिका, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील वाहनतळाच्या जागा विकसित केलेल्या नाहीत. तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगत ज्या बांधकाम परवानगी घेऊन इमारती उभारल्या आहेत. त्या सर्व इमारतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक पार्किंगच्या जागांचा व्यावसायिक वापर होत आहे. एमआयडीसी क्षेत्रात नाममात्र दराने वाहनतळाच्या जागा नेतेमंडळींनी अवैध मार्गाने गिळंकृत केल्या. त्याचा गैरवापर केला. त्यातून शेकडो कोटी रुपये कमावले. या सगळ्या अवैध प्रकरणांबाबत प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अगोदर या सर्व जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करण्यात याव्यात व त्यानंतर पे अँड पार्किंग धोरणाबाबत विचार करावा, असेही भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.