Pimpri News : वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेला अनागोंदी कारभार थांबवा – संदीप वाघेरे

एमपीसीन्यूज – वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या अनागोंदी कारभार थांबवून डाॅ. पवन साळवे व संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली केली आहे. ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पीटलवर सुरू असलेली उधळपट्टी तात्काळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पीटलवर सुरू असलेली उधळपट्टी तात्काळ थांबविण्याची गरज आहे. कोविडचे रुग्ण सध्या दिवसेंदिवस कमी होत असताना ऑटो क्लस्टर रुग्णालयाच्या ठेकेदारावर सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी वैद्यकीय विभागामार्फत होत आहे.

तर इतर लाईट बील, अ‍ॅम्ब्यूलन्स, गॅस, एसी, महापालिकेचे कर्मचारी व त्यांचे वेतन, अशी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. सध्या रुग्णालयात केवळ 80 ते 90 रुग्ण असून अनेकांना ऑक्सीजनची गरज नसतानाही डॉ.पवन साळवे यांनी केवळ ठेकेदारी सुरू ठेवण्यासाठी या ठिकाणी रुग्णांना ठेवले जात असल्याच्या संशय नगरसेवक वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

वास्तविक पाहता महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातही कोविड सेंटर असून पीएमआरडीएने देखील शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये 800 खाटांचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात सध्या केवळ 150 ते 175 रुग्ण असून उर्वरित 625 ते 650 खाटा या रिकाम्या आहेत.

वायसीएममधीलही कोविडसाठी रिक्त ठेवलेल्या खाटा पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. असे असतानाही ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालय सुरू ठेवण्याचा खाटाटोप सुरू आहे. हे रुग्णालय तात्काळ बंद करून या ठिकाणचे सर्व रुग्ण वायसीएम अथवा अण्णासाहेब मगर येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.

तसेच ऑटो क्लस्टर येथील निविदा देताना करण्यात आलेल्या अनियमिततेसंदर्भात संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ऑटो क्लस्टर येथील निविदेमध्ये पात्र ठरविण्यात आलेली स्पर्श हॉस्पीटलची निविदा ही अपात्र असतानाही त्यांना पात्र करण्यात आले आहे.

निविदेमध्ये निश्चित केलेल्या कर्मचारी संख्येपेक्षा जास्त कर्मचारी संख्या निविदा प्रक्रियेनंतर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांच्या सांगण्यावरून ऑटो क्लस्टरसाठी देण्यात आली. यावर दरमहा लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.

स्पर्श हॉस्पिटलने नेमणुक केलेल्या डॉक्टरांची संख्या देखील कमी प्रमाणात असलेली दिसून आलेली आहे. जर त्यांनी पुर्ण स्वरुपात डॉक्टरांची नेमणुक केली असेन तर हॉस्पिटलनी दिलेल्या मासिक वेतन ज्या बँकेमध्ये जमा केलेले आहे. त्या बँक खात्याच्या स्टेटमेंटची प्रत आम्हाला सादर करण्यात यावी,असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

महापालिकेने जेवणासाठी निविदा प्रक्रिया राबविलेली असतानाही ऑटो क्लस्टर येथील जेवणाचा पुरवठा थेट पद्धतीने स्पर्श हॉस्पीटलला देण्यात आला. वस्तुत: स्पर्श हॉस्पीटलकडे जेवण पुरविण्याचा कोणताही परवाना नसताना दिलेला जेवणाचा ठेका हा महापालिकेची फसवणूक असून त्याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

स्पर्श हॉस्पीटलचे मालक विनोद आडसकर हे असून त्यांच्या पत्नी या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत सहभागी होताना त्यांनी ही माहिती लपविली असून महापालिकेच्या नियमावलीचा भंग केला आहे.

विशेष म्हणजे आडसकर यांच्या पत्नी वैद्यकीय विभागातच कार्यरत असून निविदा प्रक्रियाही आरोग्य व वैद्यकीय विभागानेच राबविलेली असल्यामुळे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असून आडसकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या पत्नीची विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही वाघेरे यांनी केली आहे.

महापालिकेच्या भांडार विभागाने चादर व बेडशिटची हातमाग संघाकडून थेट पद्धतीने केलेल्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून 110 रुपयांचे बेडशिट 430 रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. तर 138 रुपयांची चादर 377 रुपयांना खरेदी करण्यात आली आहे.

यंत्रमाग संघाला दिलेल्या कामातही असाच भ्रष्टाचार झाला असून 40 रुपयांची उशी तीनशे रुपयांना खरेदी करण्यात आली, तर 15 रुपयांचे उशी कव्हर 61 रुपयांना व 10 रुपयांची नॅपकीन 45 रुपयांना खरेदी करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत हातमाग आणि यंत्रमाग संघाने दरनिश्चित केल्याचा दाखला दिला जातो. मात्र, हातमाग संघाच्या वस्तूंसाठी दर निश्चित आहेत. ही खरेदी सोलापूर येथील एका व्यवसायिकाकडून करण्यात आली असून त्याची चौकशी केल्यास एक कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार उघड होईल.

या भ्रष्टाचारामध्ये महापालिकेतील एक अधिकारी, ठेकेदार आणि महाटेक्स्टचा विजय लखनजी नावाचा एक एजंट समावेश आहे. या तिघांच्या मोबाईल नंबरची जरी माहिती मागविली तरी भ्रष्टाचार कसा झाला हे समोर येईल, असेही वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणार्‍या डॉ. पवन साळवे व इतर संबधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.