Pimpri news: ‘कोविड काळातील भांडार विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु’

आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड काळात केलेल्या व होणाऱ्या खर्चाची चौकशी व पडताळणी होऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. कोविड काळातील भांडार विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु झाली असून आमदार अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

कोविड काळात पिंपरी-चिंचवड महापालिका भांडार विभागातील खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तत्कालिन उपायुक्त यांनी केलेल्या खरेदीची चौकशी करणे आवश्यक आहे. या काळात मनपा तिजोरीची अक्षरशः लूट झालेली असून या लुटीची चौकशी होणे आवश्यक आहे.

12 फेब्रुवारी 2021 रोजी भांडार विभागातील उपायुक्त यांची बदली करण्यात आली. त्यांना दक्षता व नियंत्रण पथकाची जबाबदारी देण्यात आली. म्हणजे ज्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला त्यांनाच चौकशीचे अधिकार दिले हे कितपत योग्य आहे, असा सवाल देखील आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केला होता.

तसेच त्याची चौकशी करून त्वरित कार्यवाही करण्यात यावी. भांडार विभागातील अधीकाऱ्यांना दक्षता व नियंत्रण विभागाची दिलेली जबाबदारी रद्द करावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती.

त्यानुसार दक्षता व नियंत्रण कक्षाकडील चौकशी नेमण्यास 27 मार्च 2021 रोजी मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार कोविड काळात झालेल्या व होणाऱ्या खर्चाची चौकशी व पडताळणी होऊन कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षता व नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्वप्रथम या चौकशीची मागणी केली होती. व आता आयुक्तांनी संबधित विभागाच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे आमदार बनसोडे यांच्या मागणीला यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.