Pimpri Corona News: गर्दीच्या 85 ठिकाणी कडक उपाययोजना; विनामास्क फिरणाऱ्यांवर माजी सैनिक करणार कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महापालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड ‘मध्ये आले आहे. कडक उपाय योजनांबरोबरच सामाजिक संस्था, माजी सैनिक व ब्रिगेड यांना सोबत घेऊन बेशिस्त नागरिकांना चाप बसवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील गर्दीच्या 85 ठिकाणी कडक उपाययोजना केल्या जाणार असून विनामास्क फिरणा-यांवर सोमवारपासून माजी सैनिक कारवाई करणार आहेत.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यावेळी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार म्हणाले, महापालिकेने 19 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मास्कविना फिरणा-या 1251 लोकांवर दंडात्मक कारवाई असून त्यांच्याकडून 6 लाख 25 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. तर, आजपर्यंत 32 हजार 220 नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्कविना फिरणा-यांवर दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील टीम कारवाई करणार आहे.

वाहतूक पोलिसांची तसेच आरोग्य अधिकारी व पोलीस अशी तीन पथके कार्यरत आहेत. यांच्यामार्फत शहरात मास्क न घालणाऱ्या बेशिस्तपणे फिरणाऱ्या, रस्त्यावर थुंकणाऱ्यांना, गर्दी करणाऱ्या नागरिकांवर तसेच आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील 85 गर्दीच्या ठिकाणाची महापालिकेमार्फत रेकी करण्यात आली आहे. या ठिकाणी गस्ती पथक, तपासणी पथक देखरेख ठेवून असणार आहेत. येत्या सोमवारपासून 50 माजी सैनिक आणि दुर्गा ब्रिगेड यांच्या महिला रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहेत.

आज पर्यंत मास्क न घातलेल्या 32 हजार 220 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 64 लाख रुपयेवसूल करण्यात आले आहे. तर, रस्त्यावर थुंकणाऱ्यांना बेशिस्त नागरिकांकडून आठ लाख 21 हजार 200 रुपये वसूल देण्यात आले आहेत.

दरम्यान आज शहरात आणखी एक कंटेनमेंट झोन वाढला असून आता शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या 20 झाली आहे. तर, शहरातील अ, ब, क ,ई आणि ह या भागात सर्वाधिक रुग्ण संख्या आजपर्यंत नोंदवण्यात आली आहे.

वाहतूक विभाग करणार कडक कारवाई – डिसले

वाहतूक पोलिस विभागाकडून शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांना लगाम घालण्यात येणार आहे. यासाठी कडक उपाययोजना आखण्यात आले आहेत. यामध्ये वाहतूक विभाग मास्क न घालणाऱ्या, नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करून त्यांना चाप बसवणार आहे. कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांसोबत नाहक वाद घालणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यात येणार आहे. तसेच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.