Pimpri News: नगरसेविकेसोबतचे संभाषण ‘रेकॉर्ड’ करणा-या उपअभियंत्याला सक्त ताकीद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविकेसोबत मोबाईल फोनवर झालेले संभाषण ‘रेकॉर्ड’ करुन विभागप्रमुखांना पाठविणे उपअभियंत्याला चांगलेच महागात पडले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी या उपअभियंत्याला सक्त ताकीद दिली.

समीर दळवी असे सक्त ताकीद दिलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात गट ‘ब’ च्या उपअभियंता या जबाबदारीच्या पदावर दळवी कार्यरत आहेत. नगरसेवक महापालिकेच्या संबंधित वॉर्डाचे लोकसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत असतात. त्याअनुषंगाने नागरिकांना भेडसवणा-या समस्या, तक्रारी संदर्भात नगरसेवक अधिकारी, कर्मचा-यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून प्रश्न सोडवित असतात.

दळवी यांनी एका नगरसेविकेसोबत मोबाईल फोनवर झालेले संभाषण ‘रेकॉर्ड’ केले. ते दुस-या नगरसेवकाला ऐकविल्याचा आरोप संबंधित नगरसेविकेने महासभेत केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठित केली होती. संभाषणाचे ‘रेकॉर्डिंग’ व्हायरल झाले. सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याला ‘रेकॉर्डिंग’ पाठवल्याचे दळवी यांनी मान्य केले.

तथापि, ‘रेकॉर्डिंग’ व्हायरल केले नसल्याचा खुलासा कार्यकारी अभियंता धुमाळ यांनी केला. त्यामुळे प्रत्यक्षात ‘रेकॉर्डिंग’ कोणी व्हायरल केले. याबाबत स्पष्टता होत नसव्याने ‘रेकॉर्डिंग’ची तांत्रिक तपासणी करण्याची शिफारस समितीने केली.

हे ‘रेकॉर्डिंग’ कोणाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे सायबर सेल विभागाकडे पाठवून शहानिशा करणे शक्य नाही, असे विभाग प्रमुखांनी कळविले. उपअभियंता  दळवी यांनी लेखी जबाबात संभाषण ‘रेकॉर्डिंग’ करुन विभाग प्रमुखांना पाठविल्याचे मान्य केले. त्यांनी महापालिका वर्तणूक नियमातील तरतुदीचा भंग केला. त्यामुळे दळवी यांना सक्त ताकीद देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.