Pimpri News: शहराकरिता स्वतंत्र ‘अतिउच्चदाब संचलन’ कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव सादर करा

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश : आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात केली होती सूचना

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या पुणे परिमंडळ कार्यालययाद्वारे अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था मंडळ पुणे यांचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड शहराकरिता स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुणे परिमंडळाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 -21 मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी कपात सूचना मांडली होती. महापारेषण कंपनीचे पुणे येथे परिमंडल कार्यालय आहे. हे परिमंडल कार्यालय पुणे व सोलापूर जिल्ह्यामध्ये विस्तारीत आहे.

पुणे परिमंडलांतर्गत प्रत्येक जिल्ह्याकरिता एक अतिउच्च दाब संचलन व सुव्यवस्था मंडल मंजूर आहे. पुणे येथील अतिउच्चदाब संचलन व सुव्यवस्था मंडलांतर्गत मंजूर असलेल्या एकूण चार विभागापैकी एक अतिउच्च दाब संचलन व सुव्यवस्था मंडल विभाग पिंपरी-चिंचवड येथे आहे. पिंपरीसाठी स्वतंत्र अति उच्च दाब संचलन व सुव्यवस्था मंडल कार्यालय निर्मितीची मागणी त्यांनी या सूचनेत केली होती.

आमदार जगताप यांच्या कपात सूचनेला उत्तर देताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीद्वारे कार्यालयात अतिउच्च दाबाच्या पुणे वीज मंडळाअंतर्गत मंजूर असलेल्या चार विभागापैकी पिंपरी-चिंचवड येथे असलेल्या सुव्यवस्था मंडल विभागाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड करिता स्वतंत्र अतिउच्च दाबाच्या वीज निर्मिती कार्यालय सुरु करणे बाबत अहवाल पाठवण्याचे आदेश मुख्य अभियंता पुणे परिमंडळ यांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.