Pimpri News: कोट्यवधींची फसवणूक, मानसिक त्रास आणि जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हजारे कुटुंबीयांची राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी एकाला पावणे पाच कोटी रुपये दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने ते पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पैसे देणार नाही, म्हणत धमकी दिली. मानसिक त्रास देऊन जीवितास धोका निर्माण केला. याप्रकरणी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. आयोगाने त्यांची तक्रार दाखल करून घेतली आहे.

सुनंदा रमेश हजारे (रा. दापोडी) यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे स्वप्नील बालवडकर यांच्यापासून त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची तसेच कुटूंबाच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणल्याची तक्रार केली आहे.

हजारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2017 पासून बालवडकर हे तक्रारदार हजारे यांच्या मुलांच्या संपर्कात आले. त्यातून त्यांची आर्थिक देवाणघेवाण झाली. हजारे यांच्या लहान मुलाला रक्तदाब आणि मानसिक तणावाचा त्रास सुरु झाला असून तो मागील एक वर्षांपासून मसनिक तणावात राहत आहे. स्वप्नील बालवडकर यांच्याकडून हजारे यांच्या मुलांना पावणे पाच कोटी रुपये येणे आहे.

या संदर्भात हजारे यांच्या मुलाने ऑक्टोबर महिन्यात पोलीस आयुक्तांकडे देखील तक्रार केली आहे. बालवडकर यांचे पोलीस, राजकीय क्षेत्रात मैत्रीपूर्ण संबंध असून त्याचा दुरुपयोग करून तक्रारदार यांच्या मुलांना तो खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती हजारे यांना आहे. बालवडकर आणि त्यांच्या कुटुंबियांपासून हजारे यांच्या मुलांच्या जीवाला बरेवाईट होण्याचा देखील धोका हजारे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. बालवडकर यांनी पैसे देऊन व्यवहार पूर्ण करावा. तसेच या प्रकरणातून राज्य मानवी हक्क आयोगाने मुक्ती मिळवून द्यावी, अशी विनंती देखील हजारे यांनी केली आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाने हजारे यांच्या तक्रारीची दखल घेतली असून त्यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.