Pimpri News: राष्ट्रवादी नगरसेविकेच्या नातलगांकडून महापालिकेला 10 लाखांच्या मास्कचा पुरवठा

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत - धर यांचे नगरसेवक पद रद्द करा; युवा सेनेचे जितेंद्र ननावरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती, दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना कालावधीत 10 लाखांचे मास्क पुरविले आहेत. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत सुलक्षणा धर यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, अशी मागणी युवा सेनेचे जितेंद्र ननावरे यांनी केली आहे. याबाबतची कागदपत्रेही त्यांनी सादर केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे ननवरे यांनी ही मागणी केली आहे. येत्या सात दिवसात सुलक्षणा धर यांचे नगरसेवकपद करावे; अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही ननावरे यांनी दिला.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना ननावरे म्हणाले, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती राजू धर, बंधू राजरत्न शिलवंत, शिलरत्न शिलवंत हे ॲडीसन लाईफ सायन्स या कंपनीवर संचालक आहेत. या कंपनीने कोरोना कालावधीत महापालिकेला 10 लाखांच्या मास्कचा पुरवठा केला आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांच्या रक्ताच्या नातेवाईकांना महापालिकेतील कोणतीही कामे घेता येत नाहीत. याप्रकरणात नियमातील तरतुदींचा भंग झाला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 11 मधील पोटकलम ‘ड’ किंवा अप्रत्यक्षरित्या कलम 10, पोटकलम (2) खंड (ब) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महापालिकेचा सदस्य किंवा महापालिकेच्या कोणत्याही समितीचा सदस्य या नात्याने काम करील, तर त्याचे पालिका सदस्य म्हणून पद धारण करणे बंद होईल.

या तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत-धर यांचे पद रद्द होणे प्रचलित कायद्यानुसार बंधनकारक आहे. सुलक्षणा यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, अशी मागणी ननावरे यांनी केली आहे.

सात दिवसात नगरसेवक पद रद्द न झाल्यास उपोषण करण्यात येईल. न्यायालयीन लढा देखील लढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनाही निवेदन दिले आहे.

तक्रारकर्ते जिथे तक्रार करतील तिथे उत्तर देईल – सुलक्षणा शिलवंत – धर

याबाबत विचारले असता नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तक्रारकर्ते जिथे तक्रार करतील. तिथे मी उत्तर देईल, एवढीच मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.