Pimpri News: शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करा; काँग्रेसची मागणी

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकारांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण भरले आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी नागरीकांना जाणून बुजून वेठीस धरण्यासाठी शहरात दिवसाआड वेळी अवेळी पाणी पुरवठा सुरु केला. त्यामुळे याबाबत आढावा बैठक घेऊन नियमितपणे पूर्णक्षमतेने पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटून पत्र दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शहर सेवादलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, कबीर व्ही.एम, सतीश भोसले, पिंपरी चिंचवड युवक कॉग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, पिंपरी युवक कॉंग्रेसचे विधानसभा सरचिटणीस विवेक भाट आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदीमधून रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलले जाते. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणी पुरवठा अधिका-यांनी हिन दर्जाचे राजकारण करुन नागरिकांना वेठीस धरले. सध्या शहरात दिवसाआड पाणी देऊन वेळी अवेळी पाणी पुरवठा केला जातो.

महापालिका भवन असलेल्या खराळवाडी, गांधीनगर परिसरात तर मध्यरात्री दोन वाजता तासभर पाणी सोडले जाते. अशीच परिस्थिती सर्व शहरात आहे. त्यामुळे महिला भगिनींचे कामाचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासन वारंवार हात धुण्याच्या सुचना करते. परंतू दाट लोकवस्ती परिसरात, झोपडपट्टी परिसरात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे हे शक्य होत नाही.

या सर्व बाबींचा विचार करुन शहरातील सर्व परिसरात दररोज नियमितपणे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा. शहरातील लाखो नागरिकांना प्रशासनाने वेठीस धरले आहे. त्यातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी सचिन साठे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.