Pimpri News: शहरातील दिव्यांग कर्मचा-यांसाठी सर्वेक्षण मोहीम

एमपीसी न्यूज – दिव्यांग सर्वेक्षण मोहिमेमध्ये सहभागी होऊन पिंपरी -चिंचवड  महापालिका सेवेमध्ये कार्यरत असलेले  दिव्यांग कर्मचारी आपली माहिती नोंदवणार आहेत. शहरात वास्तव्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचा-यांना अशी माहिती नोंदवणे बंधनकारक असून  समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करून याबाबत सर्व विभागांना अवगत केले  आहे.

महापालिकेच्या समाज विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय नाविन्यपूर्ण योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांच्या योजनांचासुद्धा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID)  देण्यासाठी महापालिकेच्या वतीने “दिव्यांग नागरिकांची सर्वेक्षण मोहीम”  10 मे पासून सुरु झाली आहे. ही मोहिम  31 मे पर्यंत राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडील दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असलेल्या दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर “सारथी दिव्यांग किरण” नावाची स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे.  त्याद्वारे त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिका सेवेत असणा-या दिव्यांग  कर्मचा-यांना देखील या सर्वेक्षण मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपली माहिती नोंदवणे बंधनकारक आहे. या लिंकवर जाऊन या दिव्यांग कर्मचा-यांनी आपली माहिती भरायची आहे. पिंपरी येथील महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये दिव्यांग सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा लाभ दिव्यांग कर्मचा-यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त दांगट यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.