Pimpri News: ‘कोरोनाचे नियम पायदळी तुडविणारे महापालिका अभियंता सुनील बेळगावकर यांना निलंबित करा’

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी :

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील एका खासगी कार्यक्रमात महापालिका अभियंता सुनील बेळगावकर यांनी कोरोनाचे सर्व शासकीय निर्बंध पायदळी तुडविले आहेत. सुरक्षित अंतराचे पालन केले नाही. बेळगांवकर नृत्य करत होते. मात्र, त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. ते महापालिकेचे जावई आहेत का, असा सवाल करत बेळगांवकर यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे की, भोसरीचे विद्यमान आमदार तसेच इतर 60 ते 70 जण एका कौटुंबिक कार्यक्रमात आनंदाने बेभान होऊन नृत्य करत होते. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असते. मात्र, या मंडळींना या गोष्टींचे गांभीर्य नसल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी या कार्यक्रमात मास्क, सुरक्षित अंतराचे पालन केले नाही.

याप्रकरणी आमदारांसह 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, महापालिकेचे अभियंता सुनील बेळगावकर देखील आमदारांसोबत नृत्य करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल केला नाही याचे कारण काय.  त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष नियमावली आहे का, राज्य सरकारच्या परवानगीची ती पण लेखी स्वरूपात मिळण्याची आपण वाट पाहत आहात का.  बेळगावकर महापालिकेचे जावई आहेत ?, नक्की काय आहे. घटनेमध्ये सर्व समान असून सर्वांना एक नियम आणि एक कायदा आहे. बेळगावकर किंवा कोणीही असो. त्यामुळे बेळगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना महापालिका सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.