गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Pimpri News: निवडणुकीमुळे करवाढ टळली! आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ, दरवाढ नाही; महासभेचे शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कोणतीही करवाढ, दरवाढ होणार नाही. मिळकत कराचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रस्तावावर स्थायी समितीनंतर आज (गुरुवारी) महासभेने शिक्कामोर्तब केले. निवडणुकीमुळे सलग दुस-या वर्षी करवाढ टळली आहे. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

महापालिकेची लांबणीवर गेलेली निवडणूक फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणूक कधीही लागू होऊ शकते. निवडणूक वर्षामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ, दरवाढ होणार नाही. सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 20 फेब्रुवारी 2022 पूर्वी करांचे दर ठरविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील कलम 99 अन्वये सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी करांचे दर जैसे थे ठेवले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या 5 लाख 61 हजार मालमत्तांची नोंदणी आहे. त्यात व्यावसायिक, निवासी, संमिश्र मालमत्ता आहेत. करयोग्य मूल्याच्या टप्प्यानुसार निवासी मालमत्तांसाठी 1 ते 12 हजार रुपयांपर्यंत 13 टक्के, बारा हजार एक रुपया ते 30 हजारांपर्यंत 16 टक्के आणि तीस हजार आणि त्यापुढील मूल्यासाठी 24 टक्के असे सध्याचे दर आहेत. हेच दर आगामी आर्थिक वर्षात कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई कर, अग्निशामक कर, शिक्षण कर, वृक्ष कर, मलप्रवाह सुविधा कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ता कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. करमणूक करातही कोणतीही वाढ केली नाही. निवासेतर करशुल्कही ‘जैसै थे’ ठेवण्यात आले आहेत. सामान्य करातील सवलत योजना कायम ठेवण्यात आल्या आहेत.

याखेरिज, मालमत्ता उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आहे तसेच राहणार आहे. आयुक्तांनी 2022-2023 या आगामी आर्थिक वर्षामध्ये सामान्य कर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

 

Latest news
Related news