Pimpri News: कोरोनाग्रस्त रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा – लक्ष्मण जगताप

पिंपरी-चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, डिवाईन हॉस्पिटल बिलांसाठी रुग्णांची पिळवणूक करत आहे. : Take action against private hospitals that exploit corona patients - Laxman Jagtap

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, डिवाईन हॉस्पिटल बिलांसाठी रुग्णांची पिळवणूक करत आहे. ही रुग्णालये नागरिकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप करत या रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू करून अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

ज्याअर्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड -19 बाधित रुणांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत अनेक तक्रारी शासन स्तरावरती प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 21 मे 2020 च्या अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयाचे वैद्यकीय बिलाचे लेखा परिक्षण करणे गरजेचे असल्याचे समजते.

आपल्या स्तरावरून आपण समितीचे गठण करून नेमलेले अधिकारी यांनी काही खासगी रुग्णालयांवर नोटीस देण्याची कारवाई केली. परंतु, या खाजगी रुग्णालयांवर याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही.

त्यांनी गरिबांना लुटायचे ठरविलेलेच आहे असे दिसते. गठीत केलेल्या पथकाची माहिती शहरातील नागरिकांपर्यंत अद्यापही पोहचलेली नाही. यामुळे शहरातील कोविड बाधित रुग्णांना बिलासंदार्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते.

पालिकेच्या सारथी तसेच महापालिका संकेतस्थळावर कोविड 19 च्या पथकाची कोणतीही माहिती नोंदवली गेली नसून याचा नागरिकांना नाहक त्रास होताना दिसत आहे.

नागरिकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यासाठी आपण आपल्या सर्व संकेतस्थळावर नागरिकांसाठी कोविड 19 च्या पथकाची माहिती, दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध केल्यास नागरिकांच्या बिलासंदार्भातील समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल.

शहरातील खासगी रुग्णालयातून गोरगरीब नागरिकांची होणारी लुटमार कमी होऊन खासगी रुणालयांना चाप बसेल. कोविड 19 च्या बिलासंदार्भातील तक्रारीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची बिलासाठी पिळवणूक करणा-या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.