Pimpri news: कोरोना रुग्णांची लूटमार करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात कारवाई करा; शिवसेनेचे पालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाने कोरोना तपासणी व उपचारांकरिता निश्चित केलेल्या दरांऐवजी कोरोना बाधित रुग्णांकडून पिंपरी- चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ रकमांची बिले वसूल केली जात आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आज (बुधवारी) पालिकेसमोर आंदोलन केले.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, रोमी संधू, ज्ञानेश्वर शिंदे, माधव मुळे, हरेश नखाते आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

कोरोना बाधित रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेला वेळ पडल्यास खासगी रुग्णालयात उपचार परवडले पाहिजेत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कोरोना तपासणी व उपचारांकरिता दर निश्चित केले आहेत.

शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांकडून भरमसाठ रकमांची बिले वसूल करण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

तक्रार आल्यास पालिका प्रशासन संबंधित रुग्णालयाशी संपर्क करून शासन दरपत्रकानुसार बिले कमी करून त्या रुग्णालयावर कारवाई करीत आहे. कारवाई करण्यात येत असली तरी देखील शहरातील सर्व खासगी रुग्णालयांकडून कोरोना बाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक सुरुच आहे.

खासगी रुग्णालयात दाखल सर्व कोरोना बाधित रुग्णांचे तपासणी व उपचार हे शासन दरपत्रकानुसारच झाले पाहिजेत या करिता या खासगी रुग्णालयांचे कामकाज अधिक पारदर्शक होणे आवश्यक आहे.

कोरोना बाधित रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाना शासकीय दरांबाबत माहिती रुग्णालयातील दर्शनी भागात फ्लेक्सच्या माध्यमातून देण्यात यावी. वरील फ्लेक्सवर पालिका प्रशासनाचा हेल्पलाईन नंबर आणि ई-मेल आय डी टाकण्यात यावा.

कोरोना बाधित रुग्णाला दाखल करताना व खाजगी रुग्णालयांनी माहिती पालिका प्रशासनाला कळवीत असताना त्या रुग्णाच्या जीवनावाश्यक प्रमाणांची माहिती विहित नमुन्यात कळविणे बंधनकारक केली पाहिजे.

प्रत्येक रुग्णालयात कोरोना संदर्भात व्यवस्थापन प्रतिनिधी नेमण्यात येऊन त्यांच्याकडून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांच्या बिलिंग संदर्भात विहित नमुन्यात माहिती ई मेल किंवा फोनवर दररोज घेण्यात यावी.  माहिती पालिकेच्याकॉल सेंटरवरुन रुग्णांना संपर्क करून खातरजमा करून घ्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.