Pimpri News : शैक्षणिक शुल्क वसुलीचा तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा – मनसेची मागणी

एमपीसीन्यूज : शहरातील अनेक शाळांमध्ये पालकांना चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्याबाबत वारंवार फोन किंवा मेसेज केले जात आहेत. ज्या पालकांनी फी भरलेली नाही त्यांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले जात आहे. पालकांची फीसाठी छळवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई कारवाई; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.

सध्या कोरोनामुळे लागू केलेला लॉकडाऊन व नागरिकांच्या गेलेल्या नोकऱ्या, बंद पडलेले व्यवसाय यामुळे पालक आर्थिक संकटातून जात आहेत. असे असताना देखील पालक ऑनलाईन शिक्षणासाठी फी भरण्यास तयार आहेत. मात्र, एक तासाच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था पालकांकडून 100% फी भरण्याचा तगादा लावत आहेत. फी न भरल्यास ऑनलाईन क्लास बंद केले जात आहेत. हे कोणत्याही नियमाला धरून नाही.

या माध्यमातून या शिक्षण संस्था मुलांचा व पालकांचा मानसिक छळ करत आहात. मुळात शासनाने कोणतेही शालेय शुल्क भरण्याबाबत निर्देश दिलेले नाहीत व शिक्षणमंत्री यांनी सर्व शाळांना ६ महिन्याची फी माफ करावी, असे आवाहन केले असल्याकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास त्वरित चालू करावेत. तसेच सर्व वर्गांचे क्लास सुद्धा चालू करावेत. फी भरलेले विद्यार्थी व फी न भरलेले विद्यार्थी यांच्यातील भेदभाव लवकर थांबवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरस्वती विश्वविद्यालय, तळवडे येथे आंदोलन केले.

या प्रसंगी मनसेचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत दानवले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, प्रतिक शिंदे,  सचिन मिरपगार, तेजस दाते, कौस्तुभ देशमुख, ऋषिकेश जाधव, रोहित काळभोर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.