Pimpri news: मास्क, साबण खरेदी भ्रष्टाचारातील सहभागी असलेल्यांवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीचे उपोषण

या आर्थिक घोटाळ्यामध्ये सहभागी असणारे अधिकारी, नगरसेवक आणि पुरवठादार यांच्यावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या महामारीत झोपडपट्टीतील नागरिकांसाठी खरेदी केलेल्या मास्क, साबण खरेदीत गैरव्यवहार झाला आहे. मास्क निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि साबण खरेदीत पुरवठादाराला जादा रक्कम अदा झाल्याचे चौकशी समितीने अहवालात म्हटले आहे. या आर्थिक घोटाळ्यामध्ये सहभागी असणारे अधिकारी, नगरसेवक आणि पुरवठादार यांच्यावर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने उपोषण सुरू केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर उपोषण करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात कारवाई होईपर्यंत दररोज सकाळी 9 ते 6 या वेळेत बेमुदत चक्री उपोषण करण्याचा इशारा तायडे यांनी दिला आहे.

1 ऑगस्ट 2020 पासून शहरातील सर्व “कोविड केअर सेंटर”खासगी संस्थांना अव्वाच्या सव्वा दरात चालवायला देण्यात आली आहेत.

मुळात हे सर्व सेंटर 31 जुलै पर्यंत नागरिकांची कुठलीही तक्रार न येता पालिकेने अत्यंत उत्तमरित्या चालवली असताना हे सेंटर्स खासगी संस्थांना देण्यात आले.

हे सर्व सेंटर्स महापालिकेने खासगी संस्थांकडून काढून घेऊन पुन्हा स्वतः चालवावीत. आर्थिक गैरव्यवहारात सामील असणारे व ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे वैद्यकीय विभागाचे मुख्य अधिकारी, बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता यांचे तात्काळ निलंबन करावे.

वैद्यकीय विभागात खासगी तत्वावर कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना त्यांचे लॉकडाउन काळातील मार्च ते मे या तिन्ही महिन्यांचे संपूर्ण मानधन देण्यात यावे. या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा 50 लाखाचा विमा काढण्यात यावा, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने मानधनावर घेण्यात आलेल्या सर्व आशा सेविकांना कायम करण्यात यावे.

माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालयाच्या धर्तीवर स्थानिकांना इतर आजारांवर मोफत, रास्त व दर्जेदार उपचार मिळावेत.

यासाठी तात्काळ डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाबरोबर करार करण्यात यावा. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अपुरा ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे रुग्णालयात 8 ते 10 रुग्णांचे मृत्यु झाले आहेत. या संदर्भात दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक, अधिकारी यांचे निलंबन करून कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले असल्याचे तायडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.