Pimpri News : प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांना बडतर्फ करा : ‘प्रहार जनशक्ती’ची मागणी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांच्यावर शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत प्रहार जनशक्तीचे शहराध्यक्ष विजय तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. शिक्षण भरती घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शिरसाट याच्यासोबत जोत्स्ना शिंदे यांनी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना मान्यता दिल्या.

या प्रकणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुन्हा फेरमान्यता दिली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणामुळे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे शिंदे यांना त्वरीत पदावरुन हटवून त्यांना बडतर्फ करावे; अन्यथा जनशक्ती पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर छाया बागुल, निर्मला गुप्तेदार, महेश कनपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.