Pimpri News: शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा- प्रदीप नाईक

वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्या आणि त्यांचे हिंस्त्र होणे ही गंभीर समस्या असून याप्रकरणी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील रस्त्यांवर, गल्ली बोळात व चौकाचौकात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात हे भटके कुत्रे जास्त हिंस्त्र झाले असल्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक व इतर नागरिकांवर हल्ला करण्याची अथवा चावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.

प्रदीप नाईक यांनी याबाबतचे निवेदन पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, विरोधी पक्षनेते नाना काटे व आमदार अण्णा बनसोडे यांना पाठवले आहे.

प्रदीप नाईक यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांवर, गल्ली बोळात व चौकाचौकात भटक्या कुत्र्यांच्या संचार अधिक वाढला आहे. अन्न न मिळाल्यामुळे हिंस्त्र झालेली ही कुत्रे सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करु शकतात.

त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्तराँ बंद आहेत. अशात या श्वानाना अन्न मिळेनासे झाले असल्यामुळे ते अधिक हिंस्त्र होताना दिसत आहेत आणि हिंस्त्र झाल्यावर ते पिसाळतात. त्यामुळे ते नागरिकांवर हल्ला करण्याची अथवा चावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्या आणि त्यांचे हिंस्त्र होणे ही गंभीर समस्या असून याप्रकरणी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

नाईक पुढे असे म्हणाले की, शहरातील सहृदय, दानशूर व्यक्तींनी या बाबतीत पुढाकार घेऊन या भटक्या श्वानांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था करायला हवी. तसेच, श्वानांना संतती प्रतिबंधक लस देऊन त्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण मिळवायला हवे असे ते म्हणाले.

याप्रकरणी त्वरित लक्ष घालून लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती प्रदीप नाईक यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.