Pimpri News : डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू रोखण्यासाठी उपाययोजना करा : मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचा डेंग्यूमुळे दुर्देवी मृत्यू झाला. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेतील भाजपा नगरसेविकेचा डेंग्यूमुळे दुर्देवी मृत्यू झाला. पावसाळ्याच्या धर्तीवर डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फल्यू बाबत योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा आशयाचे पत्र मी एक महिन्यापूर्वी दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. सत्ताधारी भाजपाचे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर शहरातील सामान्य नागरिकांचे जीवन रामभरोसेच म्हटले पाहिजे.

शहरात विकास कामाच्या नावावर भर पावसाळ्यातही खोदकामाच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे आपले प्रशासन व पदाधिकारी धृतराष्ट्रीय भुमिका घेऊन अर्थपूर्ण दुर्लक्ष करुन शहरातील नागरिकांच्या जिविताशी खेळत आहे.

सध्या पावसाळा सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. नाले सफाईचा केवळ फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी साचते तसेच काही भागांमध्ये टायर, नारळाच्या करवंट्या, जुनी प्लास्टिकची भांडी, कुंड्या आदी टाकाऊ वस्तूंमधून मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, आदी साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.