Pimpri News : मानधन तत्वावर सेवेत घ्या ; कोरोना योद्ध्यांचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सेवा बजावणा-या आरोग्य कर्मचा-यांना पालिकेच्या रूग्णालयात मानधन तत्वावर कामाला घ्यावे, या मागणीसाठी या कर्मचा-यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार सुरूच असताना देखील मुदत वाढ न देता पालिकेने या कर्मचा-यांना कामावारून अचानक का कमी केलं, असा सवाल हे आंदोलक विचारत आहेत.

शहरात कोरोना काळात भितीचे वातावरण असताना पालिकेच्या रूग्णालयात आरोग्य कर्मचा-यांनी सेवा बजावली. सुरवातीला सहा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्मचारी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर एक -एक महिन्यांची मुदतवाढ दिली. आणि आता अचानक कामावरून काढून टाकले. अजूनही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असताना या कर्मचा-यांना का काढून टाकले, असा सवाल कर्मचारी विचारत आहेत.

या उपोषणात वॉर्ड बॉय, वॉर्ड आया, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ अशा 500 हून अधिक कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला आहे.

उपोषणात सहभागी महिला कक्ष मदनीस भारती कांबळे म्हणाल्या, कोरोना योद्धा बचाव समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर आणि आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

वॉर्ड बॉय हनुमंता मल्लेफुल म्हणाले, पालिकेने कसलीही मुदतवाढ न देता आम्हाला अचानक कामावरून काढून टाकले. पालिकेच्या रूग्णालयात मानधन तत्वावर सेवेत घ्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.