Pimpri Corona News : मोफत बेडसाठी एक लाख रुपये घेणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा; महापालिकेची पोलिसांत तक्रार

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथे कोरोना बाधित रुग्णाला बेड देण्यासाठी स्पर्श संस्थेच्या सल्लागाराने खासगी डॉक्टरांच्या मदतीने एक लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. स्पर्श संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आज (शनिवारी) पोलिसांत दिली.

दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता.

_MPC_DIR_MPU_II

नगरसेवक विकास डोळस आणि कुंदन गायकवाड यांनी या प्रकाराचा भांडाफोड केला होता. त्यावर नगरसेवकांनी शुक्रवारी महासभेत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर महापौरांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात आज तक्रार दिली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे मोफत उपचार केले जातात. वैद्यकीय सेवेसाठी ठेकेदारी पध्दतीने फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. शुक्रवारी महापालिका सभेत ऑटो क्लस्टरमध्ये सेवा करणाऱ्या स्पर्श संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये स्पर्श संस्थेत काम करणारे सल्लागार डॉ. प्रवीण जाधव यांनी वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे यांच्यासह स्वीकारल्याचा आरोप सभेत करण्यात आला. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment