Pimpri News : तनपुरे फाउंडेशनच्या वतीने चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदत; पोलीस आयुक्तांच्या हस्ते मदत रवाना

एमपीसी न्यूज – कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित आणि पोलीस व नागरिक मित्र संघटना यांच्या वतीने चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते 31 जुलै रोजी ही मदत रवाना करण्यात आली तर, 01ऑगस्ट रोजी चिपळूण पासून तीस – चाळीस किलो मीटर अंतरावर असलेल्या आठ ते नऊ वाड्या वस्त्यांवर ही मदत वितरीत करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. चिपळूण शहर पूराच्या पाण्याखाली गेले होते यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली तर, अनेकांचे पुराच्या पाण्याने मोठं नुकसान झाले. चिपळूण मधील खऱ्या अर्थाने असलेल्या पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी तनपुरे फाउंडेशन संचलित आणि पोलीस व नागरिक मित्र संघटना यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी मदत गोळा केली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, तसेच, वैद्यकीय साहित्य, धान्य व इतर आवश्यक साहित्य गोळा करण्यात आले.

गोळा करण्यात आलेली तब्बल दोन ट्रक मदत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते चिपळूण मध्ये रवाना करण्यात आली. एक ऑगस्ट रोजी चिपळूण पासून तीस – चाळीस किलो मीटर अंतरावर असलेल्या आठ ते नऊ वाड्या वस्त्यांवर ही मदत वितरीत करण्यात आली. फाउंडेशनच्या तेरा स्वयंसेवकांनी ही मदत वितरीत केली. पुरामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या आणि मोठं नुकसान झालेल्या अनेक कुटुंबांना यावेळी मदत देण्यात आली. अनेकांना या परिसरातील माहिती नसल्याने व खराब रस्ते यामुळे याठिकाणी मदत पोहचत नव्हती.

‘चिपळूण पासून दुरवर असलेल्या वाड्या वस्त्यांवर अधिक मदत पोहोचण्याची गरज आहे. याठिकाणी मदत पोहचत नसून अनेक मदत घेऊन येणाऱ्या संस्था चिपळूण शहरात मदतीचे वाटप करत आहेत. याठिकाणी अनेक जण मदतीचा गैरफायदा घेत असून मूळ गरजू लोकांपर्यंत मदत पोहचत नसल्याचे तनपुरे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितले. चिपळूणमध्ये मदत घेऊन येणाऱ्या लोकांनी दूरवर पसरलेल्या वाड्या वस्त्यांवर मदत द्यावी,’ असे आवाहन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षांनी केले.

चिपळूण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी यावेळी सहकार्य केले. तसेच, ग्राम सुरक्षा रक्षकांनी देखील यावेळी मदत केल्याचे तनपुरे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.